जगण यमुना आजीचं .......


 "हरीच्या मुरलीवर जीव जडे , 


 
संसार सुख दु:खाचा विसर पडे" 



शेताच्या बांधावर झाडाखाली पोत टाकून बसलेली 'यमुना आजी' ही गवळण गुणगुणत होती . श्रवणीय असा आजीचा आवाज एकूण येणारी जाणारी सुद्धा काही काळ रेंगाळून पुढे जात होती .

तिच्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर जगण्याचा शहाणपणा घेऊन बेताच्या परिस्थितीतही ताठ मानेने जगणारी यमुना आजी ... !. आजीची परिस्थिती सुरुवातीपासूनच जेमतेम होती. त्या काळानुसार तिचे लहान वयात लग्न झाले. नवरा शेतकरी, दोघं कष्टाची भाकर समाधानानं खात. वाट्याला आलेली शेतीही जेमतेम तुकडाभर..! त्यातून शेतीचा कारभार सतत बदलणाऱ्या हवामानामुळे बेजार .....पण दोघांनीही चिकाटीने संसार फुलवला. दुसऱ्याच्या शेतात कधी मजुरी करून, कधी इकड-तिकडची बारीक-सारीक काम करून पै-पै जोडली .


शेतीचा बिन भरवशाचा उद्योग ह्या दोघांनी ओळखून साठवलेल्या पै- पै मधून आजोबांनी रस्त्याच्या कडेला एक टपरीवजा हॉटेल टाकण्यासाठी छोटीशी जमीन खरेदी केली. घरात आता खाणारी तोंड वाढली होती . दोन मुले, एक मुलगी ही यमुना आजीच्या संसारवेलीवर आलेली फुल होती. प्रतिकूल परिस्थितीतही दोघं कष्टाने सार सावरत होते . परंतु अचानक पडलेल्या दुष्काळाने गावचे अतोनात नुकसान झाले आणि हातातोंडाची गाठ पडणे अवघड झाले .


आजोबांनी मुंबईला कामाला जायचं ठरवलं, तिथं काहीतरी काम मिळेलच या भरवशावर त्यांनी मुंबईची वाट धरली. त्याकाळी पक्के रस्ते किंवा वाहन आजच्यासारखे मुबलक नव्हतेच.  ते पायी निघाले . आजी केव्हाची त्यांच्या पाठमोर्‍या दिसणाऱ्या आकृतीकडे ते दिसेनासे होईपर्यंत लेकरांना घेऊन तशीच उभी होती .आजीच्या मनात अनामिक हुरहूर दाटून आली होती, त्या रात्री तिला नीट झोपही लागली नव्हती आणि सकाळी डोळा लागतो न लागतो तोच दारावर धडधड वाजले.  कुणीतरी धावत पळत सांगायला आले होते , 'जंगला जवळच्या पायवाटेने जाताना श्रीपतराव सर्पदंशाने कोसळले.....' . हे ऐकताच आजी जागेवरच खाली बसली.  पुढचा एकही शब्द तिच्या कानात गेला नाही, श्रीपतराव वाचले असते पण सर्पदंश झाला तेव्हा जवळपास एकही मनुष्यवस्ती नसल्याने त्यांना वाचवता आले नाही .


श्रीपतराव गेले तेव्हा आजीच वय जास्त नव्हतं . 27-28 वयाची यमुना, पदरात तीन मुलं , आर्थिक परिस्थिती आधीच हलाखीची, त्यात दुष्काळ आणि त्यात श्रीपतराव यांची सुटलेली साथ ! मरणाला कवटाळण्याचा  विचारही त्यावेळी यमुनाच्या मनात आला, पण तिच्या इवल्याशा लेकरांसाठी तिने जगायच ठरवल.  यमुनाच्या लहान मुलीला तर 'बाप' कळायच्या आधीच बाप तिच्या आयुष्यातून निघून गेला होता . कळती पण मरण काय असतं हे माहीत नसणारी दोन मुलं, " आय, बापू कव्हा येणार ? " म्हणून सारखा प्रश्न विचारत होती . आभाळाकडे बघत यमुना म्हणायची, ' त्या देवाला विचार .... ! 'असं म्हणून यमुना लेकरांना कुशीत घेऊन ढसाढसा रडायची .  हळूहळू दिवसामागून दिवस गेले , लेकरांसाठी यमुना ने स्वतःला सावरले.  घरात लहान मुलं ठेवून शेतात राहणं कठीण जाऊ लागलं , म्हणून यमुनाने शेती विकून दोघांनी घेतलेल्या जमिनीवर चहाच छोटस हॉटेल टाकलं . यमुना अशिक्षित होती पण हिशोब आणि व्यवहारात चोख होती.  अनंत अडचणीतही तिने एकटीने संसार पेलला होता . गावात भजन , कीर्तन होत असायची. आजी आवर्जून वारकरी सप्ताहात सहभागी व्हायची , अनेक अभंग , भजन तिचे तोंडपाठ झाले होते. विठू माऊलीच्या भक्ती सागरात आजी तीच दुःख विसरून जायची .

मुल आता मोठी झाली होती. दिवस आता बदलतील असे यमुना आजीला वाटायच.  पण देवाने जणू तिची परीक्षाच घ्यायचे ठरवले होते, थोरला मुलगा गावातल्या कुसंगतीने व्यसनी झाला होता, आणि धाकट्याची परिस्थिती लग्नानंतर ही बेताचीच होती , मुलीचे लग्न होऊन ती तिच्या सासरी . आणि यमुना आजी पुन्हा देवाला प्रश्न विचारत होती " देवा असं का ?"

दुःख पाठ सोडत नव्हतं , मग यमुना आजीने ठरवल आपणच दुःखाला सोडून द्यायचं . यमुना आजी पोटापुरती मजुरी करून उरलेला वेळ भजन-कीर्तनात राहायची.  आजीचा आवाज इतका मंजुळ की एकणाऱ्यांना एकत  राहावसं वाटायचं .

 एकदा जिल्हास्तरावर अभंग आणि गवळण गायनाची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . गावातीलच कोणीतरी तिचं नाव नोंदवून आलं . स्पर्धेपेक्षाही यमुना आजीला अभंग गवळणी एकवायची ' संधी ' मिळतेय, या आनंदाने आजी खुश झाली . तिने स्पर्धेत जाऊन आत्मसात केलेले अभंग आणि गवळणी सुरेख गाऊन दाखवले.  यमुना आजीचा स्पर्धेत प्रथम क्रमांक आला . तिथल्या मान्यवरांनी आजीला " कोकीळे सारखा गोड आवाज असणारी भक्त यमुनाबाई " या शब्दात वृत्तपत्रात नावाजले . आता आजीला स्पर्धेची दर महा शिष्यवृत्ती मिळते .

परिस्थिती प्रतिकूल असताना दुःखातही सुख शोधण्याचा प्रयत्न आजी करत राहीली.  आजीच जगणं , वागणं , बोलणं आणि गाणं सारच जगणं शिकवून गेल. 


" भंगले जरी स्वप्न तरी सोडल नाही जगणं , 

कोसळले आभाळ तरी डगमगले नाही,

पाणावले डोळे कितीदा ....

तरी प्रत्येक दिनाच्या सूर्याचे स्वागत केले शतदा...!! "


                                                                                                     - Story written by अश्विनी भोसले

Comments

  1. अश्विनी जी!
    खूप सुंदर आणि प्रवाही लिहिले, यमुना आजीच्या जीवनप्रवासात मन भरून येत होतं,नियतीला दोष नाही तर जगण्याची उमेद आज्जीला कळली होती.
    शेवटी हा प्रवास आहे आणि तो आपल्यालाच पूर्ण करायचा आहे. हे ही या कथेतून जाणवले.

    असेच लिहीत राहा!

    ReplyDelete
  2. यमुना आजीचे पुढील भागावर काम करुन ही यमुना आजी series चालु ठेवावीत अशा अपेंक्ष।सह खुप सर्व शुभेछा !
    उत्तम साहित्य👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पहिला ब्लॉग

देह हा पेटू दे

आपण नशीबवान आहोत