जगण यमुना आजीचं .......
"हरीच्या मुरलीवर जीव जडे , संसार सुख दु:खाचा विसर पडे" शेताच्या बांधावर झाडाखाली पोत टाकून बसलेली 'यमुना आजी' ही गवळण गुणगुणत होती . श्रवणीय असा आजीचा आवाज एकूण येणारी जाणारी सुद्धा काही काळ रेंगाळून पुढे जात होती . तिच्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर जगण्याचा शहाणपणा घेऊन बेताच्या परिस्थितीतही ताठ मानेने जगणारी यमुना आजी ... !. आजीची परिस्थिती सुरुवातीपासूनच जेमतेम होती. त्या काळानुसार तिचे लहान वयात लग्न झाले. नवरा शेतकरी, दोघं कष्टाची भाकर समाधानानं खात. वाट्याला आलेली शेतीही जेमतेम तुकडाभर..! त्यातून शेतीचा कारभार सतत बदलणाऱ्या हवामानामुळे बेजार .....पण दोघांनीही चिकाटीने संसार फुलवला. दुसऱ्याच्या शेतात कधी मजुरी करून, कधी इकड-तिकडची बारीक-सारीक काम करून पै-पै जोडली . शेतीचा बिन भरवशाचा उद्योग ह्या दोघांनी ओळखून साठवलेल्या पै- पै मधून आजोबांनी रस्त्याच्या कडेला एक टपरीवजा हॉटेल टाकण्यासाठी छोटीशी जमीन खरेदी केली. घरात आता खाणारी तोंड वाढली होती . दोन मुले, एक मुलगी ही यमुना आजीच्या संसारवेलीवर आलेली फुल होती. प्रतिकूल परिस्थितीतही दोघं कष्टाने सार सावरत...